राजुरा शहरातील वर्धा नदीकाठच्या नाल्याला लागून असलेल्या शेतजमीनींचे वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या धोपटाळा ओ.सी. कोळसा खाणीच्या ओव्हरबर्डनचे ढिगारे नाल्याच्या कडेला उभे केल्यामुळे नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत लाखो टन माती, गाळ आणि रासायनिक सांडपाणी वाहून थेट शेतकऱ्यांच्या सुपीक शेतात शिरत असल्याने येथील शेतकरी बांधवांची उभी पिके उद्ध्वस्त होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत काल, (२८ मे रोजी) राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार देवराव भोंगळे,बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य प्रबंधक श्री. राजेंद्र ठाकरे, नियोजन अधिकारी श्री. श्रीपुरम चक्रवर्ती आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, स्थानिक शेतकरी बांधवांसह प्रभावित शेतजमिनीची आणि नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
याठिकाणी सुमारे ६० एकर सुपीक शेतजमीन गंभीर धोक्यात आली असल्याचे दिसून आले. म्हणूनच, वेकोलिने या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्यासाठी ही संपूर्ण ६० एकर जागा संपादित करावी आणि सर्व प्रभावित शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीचा योग्य व न्याय्य मोबदला द्यावा, अशा पाहणी दरम्यान सूचना वेकोलिच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच, बाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व हा प्रश्न योग्य रीतीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, ग्रामीण महामंत्री हरिदास झाडे, शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, शुभांगी रागीट, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, प्रदीप बोबडे, दिलीप ढोले, वसंता ढोले, देवानंद नागोसे, सुरेश शेंडे, किशोर शेंडे, देविदास टिपले, पिंटू साळवे, राहुल ढोले, बालाजी बुऱ्हाण, दिवाकर ठाकरे, सुधाकर टिपले, नीलिमा शेंडे, उज्वला शेंडे, शोभा ढोले, गुणाबाई टिपले, वच्छला कावळे यांचेसह इतर उपस्थित होते.

