पो राजुरा शहरातील स्ट ऑफिस वॉर्ड, येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कु. पियू मोहन देवाळकर बालिकेची भाजप पदाधिकाऱ्यांनी मा आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात जाऊन भेट घेतली. बालकाच्या प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबीयांना धीर देण्यात आला.
यावेळी भाजप गटनेता प्रफुल कावळे, नगरसेवक भूपेश मेश्राम, भाजप शहर महामंत्री सचिन भोयर व स्वप्नील पहानपटे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राजुरा शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार अशा घटना घडत असताना नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी काँग्रेसकडून प्रभावी उपाययोजना करण्यात अपयश आल्याची टीका करण्यात आली.
नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेकडे अनेकदा तक्रारी करूनही मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

