१० ते १२ वर्षांपासून बसस्टँड नसल्याने नागरिकांची गैरसोय; लॉयड मेटल्स किंवा ACC सिमेंट कंपनीने पुढाकार घेण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा गावामध्ये गेल्या सुमारे १० ते १२ वर्षांपासून बसस्टँडची सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच उन्हात, पावसात आणि थंडीत रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गावात दररोज शाळा, महाविद्यालय, कामानिमित्त तसेच बाजारासाठी अनेक नागरिक प्रवास करतात. मात्र बसथांबा नसल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः महिलांना, विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नकोडा परिसरात मोठ्या औद्योगिक कंपन्यांचे काम सुरू असून, सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत गावाच्या विकासासाठी मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. लॉयड मेटल्स किंवा ACC सिमेंट कंपनीने पुढाकार घेत नकोडा गावात सुसज्ज बसस्टँड उभारून द्यावा, अशी मागणी नकोडा वासियांच्या वतीने करण्यात येत आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, बसस्टँड उभारल्यास प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळेल. तसेच गावाच्या विकासालाही चालना मिळेल. संबंधित प्रशासनाने आणि कंपन्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी
सचिन कोंडावर

