आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पीक विमा प्रकरणांची फेरतपासणी करण्याचे कृषिमंत्री यांचे निर्देश


चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; नुकसान भरपाई नाकारलेल्या प्रकरणांचा होणार विशेष आढावा

पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष नुकसान, हवामान नोंदी व शेतकरी निवेदनांचा विचार करण्याचे निर्देश

 

मुंबई – खरीप हंगाम २०२५-२६ मधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्हा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान होऊनही तांत्रिक कारणांच्या आधारे नुकसान भरपाई नाकारण्यात आल्याचा गंभीर मुद्दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी संबंधित सर्व प्रकरणांची विशेष फेरतपासणी करण्याचे निर्देश देत पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.*

कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान होऊनही केवळ तांत्रिक उत्पादनाच्या निकषांवर आधारित नुकसान भरपाई नाकारण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ व न्याय्य फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केवळ तांत्रिक अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतपातळीवरील नुकसान, पीक कापणी प्रयोगांची माहिती, हवामान विषयक नोंदी तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त निवेदने यांचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कृषिमंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित सर्व प्रकरणांची विशेष फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई नाकारण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची विशेष फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. फेरतपासणीदरम्यान प्रत्यक्ष नुकसान, पीक कापणी प्रयोग, हवामान नोंदी आणि शेतकऱ्यांची निवेदने विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित विमा कंपनीने फेरतपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व प्रकरणांचा पारदर्शक व न्याय्य पद्धतीने निपटारा करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला कृषी सचिव रस्तोगी,कृषी उप आयुक्त बोरकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत,यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा कृषी अधीक्षक श्री शंकर तोटावार,विजय पिदूरकर, रवी निगुडे, बंडू गौरकार ,विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *